२२ लाखांच्या फसवणूक प्रकरणी सावकार निलेश कीरला अटक

रत्नागिरी:- जमीन विक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचाऱ्याला तब्बल २२ लाख रुपयांचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या व्याजी व्यावसायिक निलेश कीरला शहर पोलिसांकडून मंगळवारी अटक करण्यात आली. कीर याने वकिलाला हाताशी धरुन फसवणुक केल्याची तक्रार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अटक टाळण्यासाठी कीर याने रत्नागिरी न्यायालयापुढे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताच मंगळवारी शहर पोलिसांकडून कीर याला अटक केली.

जिल्हा परिषद कर्मचारी संदीप मधुकर वेलोंडे यांनी फसवणुक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे वेलोंडे यांची आणि निलेश कीर यांची ओळख होती. वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाख रुपयांची तात्काळ आवश्यकता होती. वेलोंडे यांनी निलेश कीर याच्याबाबत माहिती दिली. गराटे यांनी निलेश कीर याच्याकडून १० लाख रुपयांची व्याजी रक्कमेची मागणी केली. घेतलेली रक्कम गराटे हे परतफेड करू न शकल्याने त्यांनी ओरी येथे असलेली २५ एकर जमीन निलेश कीर यांच्या नावावर करून दिली. जमीन नावावर करून दिल्यानंतरही निलेश कीर आणि गराटे यांच्यात वादावादी झाली. ही वादावादी झाल्यानंतर मध्यस्वी झाल्यानंतर वेलोंडे यांना बोलावून घेण्यात आले.

१० लाखाच्या बदल्यात २५ एकर जमीन कीर यांनी आपल्या नावावर करून घेतली. मात्र ही जमीन कीर यांना नको असल्याने मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांना आपल्याकडील जमीन विकत घेण्याचा तगादा लावला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ती २५ एकर जमीन मध्यस्थ असलेल्या वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला.

अॅड. महेश नलावडे यांच्या कार्यालयात निलेश कीर यांच्या सांगण्यानुसार २५ एकर जागेचे खरेदीखत तयार केले होते. ठरल्याप्रमाणे २२ लाख ७२ हजार रोख रक्कम निलेश कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांच्या समोर या खरेदीखतावर सह्या करण्यात आल्या. निलेश कीर याने हातात रकम स्वीकारल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो असे सांगुन त्याठिकाणाहून पसार झाला. जमीन नावावर न करता फसवणुक कल्याप्रकरणी कीर याच्याविरुद्ध शहर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) ३०८ (३), ३ (५), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४४, ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.