देवरुख-पठारवाडी येथे पोलिसांनी हातभट्टीवर धाड

रत्नागिरी:- देवरुख-पठारवाडी (ता. संगमेश्वर) येथे पोलिसांनी दारु अड्डयावर टाकलेल्या धाडीत ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सावजी पर्शराम (५२, रा. देवरुख पर्शरामवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सकाळी पावणे अकराच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवरुख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारुचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये ३८ हजाराचे ७५० लिटर गुळ व नवसागर मिश्रीत उकळते रसायन बॅरल सहित. ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची ॲल्युमिनियम डेग, २ हजार १०० रुपयांची २० लिटर गावठी दारु असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हातभट्टीची दारु गाळण्याची भट्टी बांधून गावठी दारु गाळत असताना संशयित सापडला. या प्रकरणी पोलिस हवालदार अभिषेक वेलवणकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.