खिशातून चौदा हजार रुपये लंपास करणारा चोरटा जेरबंद

खेड:- खेड एसटी स्थानकातील सुलभ शौचालयानजीक एका वृद्ध प्रवाशाला खाली पाडत त्यांच्या खिशातून १४ हजार रु.चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या येथील पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या. उमेश सदानंद उतेकर (चाकाळे-देऊळवाडी खेड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली १४ हजाराची रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली.

नथुराम धर्मा धोत्रे (५०, रा. मोरवंडे-बौद्धवाडी, खेड) हे बसस्थानकातील सुलभ शौचालयात गेले असता चोरट्याने त्यांना धक्का मारत खाली पाडून त्यांच्या खिशातील १४ हजार रु. लंपास करत पोबारा केला होता. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती दिली. त्यानुसार पो.कॉ. प्रकाश पवार चोरट्याचा माग घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.