अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड करणार तपास
रत्नागिरी:- कोकण नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचालनादरम्यान झालेल्या दोन घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्यामार्फत या घटनेची चौकशी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
चौकशीचा अहवाल तात्काळ देण्याचे सूचनाही श्री. कुलकर्णी यांनी केल्या आहेत. तर शहर शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे स्वतःहून घरगुती अडचणी निमित्त सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शहरातील कोकणनगर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन केले. या दरम्यान मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संचलनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना अडवले त्यानंतर पथसंंचलन मार्गस्थ झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सकल हिंदू समाजाच्यावतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तर त्याच रात्री कोकण नगर येथे मोहल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चार्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला होता.
या दोन्हीही घटनानंतर या प्रकाराची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर , उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप यांनी लेखी पत्राद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एसआयटीची स्थापन करून दोन्ही घटनांची चौकशी करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना केल्या आहेत. चौकशी अहवाल लवकरात लवकर देण्यात सूचनाही करण्यात आल्या आहेत तर घरगुती अडचणीमुळे शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे सुट्टीवर गेल्याने पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याकडे शहर पोलीस स्थानकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.









