रत्नागिरी:- मासेमारीवरुन तरुणांमध्ये जोरदार वाद पेटला. यावेळी लाकडी दांडका डोक्यात मारुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितांविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप वासुदेव शिवगण (रा. गावखडी, शिवगणवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) रात्री सव्वा अकराच्या सुमारास पुर्णगड खाडीकिनारी थोरले खाजण येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अमर अनंत शिवगण (३८, रा. गावखडी, शिवगणवाडी, रत्नागिरी) हे आणि संशयित एकाच वाडीत राहणारे, मंगळवारी संशयित प्रदीप याने थोरले खाजण येथे मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्यांच्या खाली फिर्यादी यांनी जाळे लावले त्यामुळे प्रदीप यांना मासे कमी मिळाले याचा राग मनात धरुन त्याने फिर्यादी अमर यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अमर शिवगण यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.