गुहागर:- गणेशोत्सवासाठी गुहागर तालुक्यातील आपल्या मूळ गावी खोडदे येथे येण्यासाठी एक तरुण दि. ६ सप्टेंबर रोजी दादर स्थानकातून पहाटे सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसने निघाला होता. मात्र, तो गावी पोहोचला नाही. दि. ८ रोजी दुपारी पनवेलनजीक तळोजे खाडीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. अक्षय संतोष साळवी (२८, सध्या रा. भांडूप-मुंबई) असे त्याचे नाव आहे.
हा तरुण तुतारी एक्स्प्रेसने गावी येण्यासाठी निघाला असताना तो गावी न पोहोचता त्याचा मृतदेह तळोजा खाडीमध्ये कसा सापडला या बाबतचा तपास पोलिस करीत आहेत. अक्षय याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल (रायगड) येथे आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच खोडदे गावातून त्याचे नातेवाईक पनवेल येथे दाखल झाले. गणेशोत्सवासाठी गावाला येणाऱ्या तरूणाचा मृतदेह सापडल्याने खोडदे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.









