ग्रामसेवकांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा विषय मार्गी

जिल्ह्यात 132 ग्रामसेवकांना फायदा

रत्नागिरी:-ग्रामसेवकांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाचा विषय गेली दोन वर्षे प्रलंबित होता. मात्र जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी यामध्ये लक्ष घालून तो सोडवला आहे. या योजनेंतर्गत 132 ग्रामसेवकांना फायदा झाला आहे.

ग्रामसेवकांना वेतनामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासनाने सुधारित आश्वासित प्रगती योजना अंमलात आणली. मात्र गेली दोन वर्षे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामसेवकांना मिळत नव्हता. याबाबत ग्रामसेवक संघटनेमार्फत वारंवार प्रशासनानला निवेदनही देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले.
जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे ग्रामसेवक संघटनेने आपली व्यथा मांडली होती. याची त्वरित दखल घेऊन ग्रामपंचायत विभागाला याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मनिषा देसाई यांनीही याची त्वरित दखल घेत जिल्ह्यात 132 ग्रामसेवकांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

ग्रामसेवक संघटनेमार्फत जि. प. अध्यक्षांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए. के. शिंदे, सचिव संजय दळवी, उपाध्यक्ष जे. टी. जाधव, कोषाध्यक्ष नाथा पाटील, संतोष हुमणे, जी. डी. बडद आदी उपस्थित होते.