रत्नागिरी:- शहरातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर धडक मारली. शहरात सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मोकाट गुरे, कुत्र्यांचा सर्वांनाच त्रास होत आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना नगरपालिका फवारणी करताना कुठे दिसत नाही. शिवाय कॉंक्रीटीकरण सुरू असताना गॅस पाईपलाईनची खोदाई तत्काळ बंद करण्याबाबत भाजपाने मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेतला. या सर्व प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढतो, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली.
रत्नागिरी शहरात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. डेंग्यूचा आजार सर्वत्र पसरला आहे. अनेक लोक सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल झाले आहेत. खासगी रुग्णालयातही या रुग्णांची गर्दी आहे. त्यामुळे फवारणी करावी, तसेच पावसाळ्यात स्वच्छता करताना ब्लीचिंग पावडरचा वापर करावा, अशी मागणी भाजपाने केली. शहरात उनाड गुरांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी उनाड गुरांमुळे अपघात होत आहेत. तसेच शहरात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत आहेत. पालिकेने संपूर्ण शहरात एकाच वेळी औषध फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसून येत आहेत. हे खड्डे जांभ्या डबरने बुजवले जातात. मात्र हे खड्डे पावसाळी डांबर वापरून बुजवणे आवश्यक आहे. उनाड गुरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपाने केली.
या सर्व प्रश्नांवर त्वरित मार्ग काढून कामे पूर्ण करावीत, असेही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले. शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनद्वारे गॅस दिला जात आहे. त्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम भर पावसात सुरू आहे. तसेच कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पावसाळ्यात गॅस पाईपलाईनच्या खोदकामचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्ता सुस्थितीत राहणे अत्यावश्यक असल्याने पाईलपाईनचे खोदकाम तात्काळ थांबवा, अशी मागणी या वेळी जिल्हाध्यक्षांनी केली. हे खोदकाम आपण थांबवण्यास सांगितले असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर यांच्यासह भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. हृषिकेश केळकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, शेखर लेले, शैलेश बेर्डे, नितीन गांगण, दादा ढेकणे आदी उपस्थित होते.









