रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत शिकणाऱ्या मुलींशी गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकाची उच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवण्यात आली. रमेश रतन – जाधव (५३, रा. पोचरी संगमेश्वर) असे या शिक्षकाचे नाव आहे. रत्नागिरी पॉक्सो कोर्टाने या शिक्षकाला ५ वर्षे तुरुंगवास व ९ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निकालांविरूद्ध संबंधित शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवली.
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे नमूद केले की, ट्रायल कोर्टाच्या निकालात विकृती दर्शविणारी कोणतीही केस तयार केली जात नाही. टायल कोर्टाने पुराव्याची योग्य प्रशंसा केली हाती व योग्य रितीने दोषारोप नोंदविला होता. त्यामुळे ट्रायल कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयाने आपल्या निकालात नोंदविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश जाधव हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होता. डिसेंबर २०२१ रोजी रमेश जाधव याने पहिलीत शिकणाऱ्या ३ मुलींना शाळेचा युनिफॉर्म दिला होता. २४ डिसेंबर २०२१ रोजी या मुली शाळेत युनिफॉर्म घालून आल्या. यावेळी संशयित रमेश जाधव याने शाळेच्या इतर मुलांना वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच वर्गाचा दरवाजा बंद करून पहिलीत शिकणाऱ्या या मुलींशी लैगिक गैरवर्तन केले. हा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी या संबंधित शिकक्षांविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशतिय आरोपी याच्याविरूद्ध भादवि कलम ३५४ (अ) व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच गुन्ह्याचा तपास करून पॉक्सो न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी या खटल्याचा निकाल दिला होता. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी युक्तीवाद केला होता. खटल्यादरम्यान एकूण १३ साक्षिदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आले. आरोपी रमेश जाधव याच्याविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने त्याला ५ वर्षे सश्रम कारावास व ९ हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती.