गांजा ओढण्यास विरोध केल्याने दोघांचा प्रौढावर चाकूने हल्ला

खेड:- घरासमोरील एसटी पिकअप् शेडमध्ये गांजा पित असताना मिळून आले तसेच या आधी समज दिल्याच्या कारणातून एका ४५ वर्षीय प्रौढावर गावातील दोघांनी चाकूचा वार करून पलायन केले. ही घटना ८ मे रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास तालुक्यातील सवणस खुर्द मोहल्ला येथे घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाकीब अब्दुल सलाम सुर्वे (वय ४०), तलत अब्दुल सलाम सुर्वे (४४, दोन्ही रा. सवणस खुर्द मोहल्ला) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यामध्ये फिर्यादी शेख दाउद आदम सुर्वे (४५, रा. सवनस खुर्द मोहल्ला, ता. खेड) हे जखमी झाले आहेत. यातील फिर्यादी व संशयित एकाच गावातील राहणारे असून, यातील संशयित हे फिर्यादी यांच्या घरासमोरील एसटी पिकअप् शेडमध्ये गांजा पित असताना मिळून आले. म्हणून फिर्यादी यांनी त्यांना दोनवेळा समज दिली होती. त्या रागाने फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत मशिदीसमोर रोडवर बोलत असताना दोन संशयितांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्याजवळ असलेल्या सुऱ्याने डाव्या हातावर दोन वार व उजव्या हाताच्या करंगळीवर तिसरा वार केला. त्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.