रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खून प्रकरणात संशयित आरोपी वेदांत आखाडे याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहे. वॉचमनचा लाकडी दांडक्याने वार करून खून करताना रक्ताच्या चिळकांड्या वेदांत याच्या कपड्यांवर उडाल्या होत्या. रक्ताचे डाग असलेले हे कपडे पोलिसांकडून प्रयोगशाळेत नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
तपासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरू शकतो असे मानले जात आहे. अशोक महादेव वाडेकर (७०, रा. गवळीवाडा रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. अशोक हे घरापासून जवळच असलेल्या श्री गणेश रेसिडेन्सी इमारतीमध्ये वॉचमनं म्हणून काम करत होते. याच इमारतीमध्ये संशयित आरोपी वेदांत चंद्रकांत आखाडे हा देखील वास्तव्यास असतो.
संशयित आरोपी वेदांत याने गच्चीची चावी मिळावी म्हणून वॉचमन वाडेकर याच्याकडे तगादा लावला होता. मात्र वाडेकर हे चावी देत नसल्याने यातून दोघांमध्ये वाद होत होता. अशोक वाडेकर चावी देत नसल्याच्या रागातून २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी वेदांत याने लाकडी दांडक्याने वार करून अशोक वाडेकर यांचा खून केला, असा आरोप वेदांत याच्यावर ठेवण्यात आला आहे.
वेदांत याने अशोक यांचा खून केल्यानंतर लाकडी दांडका घटनास्थळापासून जवळच असलेल्या झुडपात लपवून ठेवला होता. तसेच आपल्या अंगावरील रक्ताचे डाग साफ करण्यासाठी तातडीने तो घरी आला. यावेळी वेदांत याने आपल्या अंगावरील रक्ताचे डाग धुतले. तसेच कपडे घरीच काढून ठवले होते.
खूनाची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत होता. अशोक वाडेकर व वेदांत यांच्यातील यापूर्वीचा वाद व वेदांत यांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांचा संशय बळावला.