नांदिवडे खून प्रकरणातील संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे भंडारवाडा येथील सुरेश पडवळ यांच्या खूनातील संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. मनराज दत्ताराम चव्हाण (५१, रा. दोन्ही नांदिवडे भंडारवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मृत सुरेश याची पत्नी शीतल व मनराज यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरेश याला होता. यातून वाद झाल्याने त्याची पत्नी शीतल व मनराज यांनी सुरेश याचा लाकडी बांबूने मारून खून केला, असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर मागील ६० दिवसांपासून मनराज हा जेलमध्ये आहे. आपण या प्रकरणात निर्दोष असून आपल्याला जामीन मिळावा, यासाठी मनराज याच्यावतीने सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयापुढे या जामीन अर्जावर सुनावणी झाली. गुन्ह्यातील माहितीनुसार, सुरेश धोंडू पडवळ (६४, रा. नांदिवडे भंडारवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. पत्नी शितल हिचे मनराज चव्हाण याच्याशी अनैतिक संबंध आहेत, यावरून सुरेश याचे पत्नी शीतल हिच्याशी वारंवार वाद होत होता. यातूनच २५ जानेवारी २०२४ रोजी शीतल हिने तिचा प्रियकर याच्या मदतीने खून केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मनराज चव्हाण व सुरेश याची पत्नी शीतल पडवळ (५१) यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२,१२० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन्ही संशयिताना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

मनराज चव्हाण याच्या वकिलांकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, मनराज निर्दोष असून कोणताही गुन्हा केलेला नाही. मृत सुरेश याच्याशी त्याचा कोणताही संबंध दिसून येत नाही. आरोपीविरूद्ध कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडून न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नाही. नाहक या प्रकरणात मनराज याला गोवण्यात आले आहे. आरोपी ६० दिवसांपासून जेलमध्ये असून गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात यावे. न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे आरोपी पालन करेल, असे सांगण्यात आले. तर सरकारी वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, आरोपीविरूद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या

तपासात आरोपीविरूद्ध ठोस पुरावे आहेत. मृताची पत्नी व मनराज यांच्यात अनैतिक संबंध होते, हे तपासात समोर आले असून हेच खून करण्यासाठी महत्वाचे कारण ठरल्याचे तपासात आढळले आहे. आरोपीची जामिनावर मुक्तता केल्यास तो साक्षीदारांना घमकावू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल देताना असे नमूद केले की, साक्षीदारांच्या टिपणानुसार मनराज व मृताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध होते, असे दिसून येत आहे. तसेच मनराज हा मृताची पत्नी हिच्या घरी येत जात असे. पोलिसांकडील तपासाची कागदपत्रे तपासली असता प्रथमदर्शनी आरोपी मनराज याच्याविरूद्ध पुरावे असल्याचे दिसून येते. यामुळे आरोपी याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले.