गस्तीनौका होतेय मत्स्य विभागाला डोईजड

९० हजाराचे भाडे ; वारंवार तांत्रिक बिघाडामुळे पडते बंद

रत्नागिरी:- सागरी गस्तीसाठी मत्स्य विभागाला मिळालेली रामभद्रा ही स्पीडबोट (गस्तीनौका) मत्स्य विभागाला पांढरा हत्ती पोसल्याप्रमाणे झाली आहे. फायबर बोट असल्याने मजबुतीबाबत प्रश्न असून घुसखोरी केलेल्या नौकांचा पाठलाग करताना काहीही होण्याची भिती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. इंजिन आणि जनरेटर तांत्रिक बिघाडामुळे वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे दिवसाला ९० हजार भाडे असलेली ही गस्ती नौका डोईजड झाली आहे. एवढे भाडे असलेल्या या गस्ती नौकेची मजबुती आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही शासनाने विचार करण्याची गरज आहे.

गस्ती नौका आल्यामुळे परप्रांतिय घुसखोरीला लगाम बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. शासनाने रामभद्रा ही स्पीड बोट मत्स्य विभागाला गस्ती नौका म्हणून दिली. या नौकेला दिवसाला ९० हजार भाडे आहे. शासनस्तरावर ते दिले जाणार आहे. त्यामुळे नौका प्राप्त झाल्यापासून किती नौकांवर कारवाई केली याबाबत मत्स्य विभागाकडे माहिती मागविल्यानंतर रामभद्रा या स्पीड बोटीबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या.

अनेक वर्षांपासून या स्पीड बोटीची प्रतीक्षा होती. दोन महिन्यांपूर्वीच या स्पीड बोटीचे लोकार्पण करण्यात आले. परंतु ही स्पीड बोट म्हणजे पांढरा हत्ती पोसल्याप्रमाणे असल्याची प्रतिक्रिया येत आहे. यापूर्वीच मासेमारी नौका गस्तीसाठी वापरण्यात येत होती. या नौकेलाही दिवसाला २० हजार भाडे होते. परंतु या नौकेचा घुसखोरी रोखण्यासाठी फारसा उपयोग होत नव्हता. परप्रांतीय नौका हायस्पीडच्या आणि सुमारे ४०० अश्वशक्ती असलेली इंजिन आहेत. त्यामुळे ही नौका त्यांचा पाठलाग करू शकत नव्हती.
शासनाकडून आता मिळालेली रामभद्रा नौकेचे इंजिन ४०० अश्वशक्तीचे हायस्पीड आहे. परंतु ती स्टीलची किंवा लाकडी नव्हे, तर फायबर बोट आहे. ती तेवढी मजबूत आहे का या शक्यतेने कर्मचाऱ्यांमध्ये भिती आहे. त्यात या नौकेचे इंजिन वारंवार बंद पडत आहे. जनरेटरमध्येही तांत्रिक दोष असल्याने कर्मचारी गस्ती नौकेबाबत हैराण आहेत. दिवसाला ९० हजार भाडे असलेली ही रामभद्रा गस्ती नौका आता मत्स्य खात्याला डोईजड होत आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसह मजबूत नौका गस्तीसाठी द्यावी, अशी मागणी होत आहे.