रत्नागिरी:- अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढल्यावर अभिमानाने प्रवास करणार या अभियानांतर्गत कोकण रेल्वेने सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. जानेवारी 2024 महिन्यात 9 हजार 548 अनधिकृत किंवा अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 2 कोट 17 लाख 97 हजार 102 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे प्रशासन गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस, शिमगोत्सव, उन्हाळी सुट्टीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. तरीही कोकणकन्या, मांडवी, तुतारी यासारख्या नियमित गाड्या भरून जातात. काही वेळेला आरक्षित डब्यात चढून काही प्रवासी इच्छित ठिकाणी जातात. तर काहीवेळा गर्दीमुळे तिकिट काढले जात नाही किंवा आॅनलाईन तिकिट कन्फर्म न झाल्यामुळे ते रद्द होते. अशावेळी विनातिकीट प्रवास केला जातो. त्याचा फटका कोकण रेल्वे प्रशासनाला बसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरु करण्यात आली. ती पुढे कायम ठेवण्यात आली आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये कारवाई केलेल्या प्रकरणांची संख्या 9 हजार 548 असून 2 कोटी 17 लाख 97 हजार 102 दंड वसूल करण्यात आला आहे. तत्पूर्वी डिसेंबर 2023 मध्ये एकूण 6 हजार 675 अनधिकृत, अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले होते. त्यांच्याकडून 1 कोटी 95 लाख 64 हजार 926 रूपये दंड वसूल करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत 18 हजार 466 अनधिकृत व अनियमित प्रवासी तिकिटांशिवाय आढळून आले. त्यांच्याकडून 5 कोटी 60 लाख 99 हजार 017 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे. ही मोहीम पुढील काही दिवस सुरु राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोकण रेल्वेने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आला आहे. भविष्यात केआरसीएल संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहिम तीव्र करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.