दोन भावांवर सुऱ्याने वार करणाऱ्याला कारावासाची शिक्षा

राजापूर:- तालुक्यातील बाकाळे गावात दोघा भावांवर सुऱ्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश सीताराम पवार (रा. बाकाळे) याला राजापूर न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च २०२१ मध्ये हा गुन्हा घडला होता. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. ओंकार गांगण

यांनी न्यायालयात बाजू मांडली. बाकाळे येथील प्रशांत प्रकाश पवार यांचे वडील व पत्नी गणेश पवार याच्या घरासमोरील पायवाटेने घरी जात होते. तेव्हा गणेशने शिवीगाळ केली. त्यामुळे वडिलांना आणि पत्नीला शिव्या का दिल्या, अशी प्रशांत आणि त्याचा भाऊ प्रमोद या दोघांनी गणेश याच्याकडे विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत घरातून मासे कापण्याचा सुरा आणून प्रशांतच्या डोक्यावर व मानेवर वार केला. त्यानंतर त्याच्या भावाच्याही डोक्यावर सुरा मारून ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी ४ मार्च २०२१ रोजी नाटे पोलीस स्थानकात गणेश पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायाधीश नलावडे यांनी निकाल देताना गणेश पवार याला कलम ३२४ अन्वये २ महिने सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, कलम ५०४ अन्वये १ महिना सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड व कलम ५०६ अन्वये २ महिने सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.