संगमेश्वरः– तालुक्यातील देवरूख भंडारवाडी येथे सख्ख्या मेव्हणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करून मातृत्व लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरूणीने या प्रकरणी देवरूख पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरूद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी पोलिसांकडून संशयिताला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी याला लहान मुल असल्याने पत्नीच्या मदतीसाठी मेव्हणी घरी वास्तव्याला आली होती. याकाळात पत्नी घराबाहेर गेल्याचा फायदा उठवत संशयिताने पीडितेशी जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केले अशी तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान जुलै 2023 रोजी पीडित ही कडवई येथील आपल्या मूळ गावी परतली. यावेळी तिला अस्वस्थ जाणवू लागल्याने नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यानी चिकित्सा करण्यासाठी पिडीतेची सोनोग्राफी करण्यास नातेवाईकांना सांगितले. सोनोग्राफीमध्ये पिडीता ही गर्भवती असल्याचे समोर आले आपली अविवाहीत मुलगी गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी याबाबत पिडीतेला विश्वासात घेवून चौकशी केली असता संशयित आरोपीने आपल्याशी जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केल्याचे उघड केले. पिडीतेकडून देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कलम 376 (2), (एफ) (एन) (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच संशयिताला पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.