रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील मारुतीच्या देवळातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने विजय रमनेवल प्रजापती (वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार कोकण नगर) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.
शनिवारी पहाटे मारुती मंदिर येथील मंदिरात अज्ञात इसमाने चोरी-घरफोडी करून मंदिरात असणारी दान पेटी फोडून पैसे चोरी केली. शहर पोलीस ठाण्याच्या गुड मॉर्निंग स्क्वॉड मधील पोहेकॉ संतोष सावंत यांना निरीक्षणा दरम्याने निदर्शनास आल्याने तात्काळ पहाटे ०५:३० वा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून शहर पोलीस ठाणे येथे मंदिराच्या ट्रस्ट कडून खबर मिळाल्याने गुन्हा रजिस्टर नंबर ३७/२०२४ भा.द.वि संहिता कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत मारुती मंदिरातील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच शहरातील अन्य परिसरांमधील सी.सी.टी.व्ही फुटेज यांची लागलीच पडताळणी करण्यात आली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरामध्ये आरोपीचा शोध घेण्यात आला. अवघ्या काही तासात विजय रमनेवल प्रजापती (वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार कोकण नगर मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मारुती मंदिरातील दान पेटी मधून चोरलेली एकूण रक्कम 84,588/- रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी विजय रमनेवल प्रजापती याने रत्नागिरी व अन्य ठिकाणी आणखी चोरी-घरफोडीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास या पथका मार्फत सुरू आहे.