रत्नागिरी:- संपूर्ण महाराष्ट्रात मराठा-कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात चार लाख 16 हजार कुणबी नोंद आढळून आल्या तर मराठा कुणबी 130 नोंदी आढळल्या. आता पुढील तीन महिन्यात खुल्या प्रवर्गांच्या नोंदी केल्या जाणार असून त्यासाठी 5,530 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेला दिली.
प्रत्येक जिल्ह्यात खुल्या प्रवर्गाच्या नोंदी करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी 20 नोडल अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून 5530 कर्मचार्यांची गावागावात नेमणूक केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक कर्मचार्यांकडे कुटुंबांची यादी दिली जाणार आहे. यामध्ये 35 पानी अर्ज भरायचा असून, खुल्या प्रवर्गातील कुटुंबियांची संपूर्ण नोंद केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यात या नोंदी केल्या जाणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर कुणबी-मराठा नोंदी तपासल्या गेल्या. जिल्ह्यात यासाठी 1967पूर्वीचे सुमारे 50 प्रकारचे अभिलेख तपासण्यात आले. यामध्ये 130 कुणबी-मराठा नोंदी आढळून आल्या. त्यातील 5 ते 6 जणांनीच याचे दाखले घेतले आहेत. जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या नोंदीमध्ये 4 लाख 16 हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात कुणबी वर्ग असून हा समाज 25 टक्केहून अधिक आहे. यातील 3 लाख 90 जणांनी आतापयर्र्त दाखले घेतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.