सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्याला सशर्त जामीन मंजूर

रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून त्यावर मुलीचे अश्लील फोटो प्रोफाईल व स्टोरीवर ठेवणाऱ्या संशयिताला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

काही दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल झाला होता. संशयिताला न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी व २५ हजाराचा सशर्त जामीन बुधवारी मंजूर केला. युवराज हेमंत राठोड ( २०, रा. कारवांचीवाडी , मूळ गाव जालवाद, ता. देवरहिप्पी, जि. विजापूर ) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ११ ते १२ सप्टेंबर सकाळी ८ वाजताच्या सुमारास इन्स्टाग्राम ॲपवर निदर्शनास आली. त्यानुसार , संशयित युवराजने मुलगी अल्पवयीन होती म्हणून प्रेमसंबंध चालू ठेवले नाहीत. तिच्याशी संपर्कही तोडला मात्र त्याने पीडित मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करुन तिचे अश्लील फोटा अपलोड केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ३५४ ( अ ) ५०० पोक्सो कायदा कलम ८, १२ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ ( ब ) नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस तपास करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक केली होती. न्यायालयाने गुरुवार २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी संशयिताने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंबालकर यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली . संशयित आरोपीला न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी व २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.