रत्नागिरी:- शहराच्या नवीन पाणी योजनेची पाईपलाईन फुटण्याची साडेसाती काही कमी होत नसल्याने अखेर या योजनेचे हायड्रोलिक टेस्टींगचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी जेलनाका ते गोडीबाव दरम्यान हे टेस्टींग करण्यात आले. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.
रत्नागिरी शहरासाठी सुमारे 63 कोटी रुपये खर्च करुन नवीन नळपाणी योजना राबवण्यात आली. ही नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. मात्र ही योजना सुरु झाल्यापासून पाण्याच्या दबावाने ही वाहिनी सातत्याने फुटत आहे. त्यामुळे या योजनेचे हायड्रोलिक टेस्टिंग व्हावे अशी मागणी वारंवार शहरातील लोकप्रतिनिधींकडून होत होती.
पाणी पुरवठा सुरु होऊन वर्ष-दीड वर्ष झाले तरीही पाईप लाईन फुटण्याचे थांबत नव्हते. या दरम्यान ठेकेदाराची कामाची काही रक्कमही त्यामुळे नगर पालिकेने दिली नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर रविवारी नळपाणी योजनेचे जेलनाका ते गोडीबाव दरम्यान हायड्रोलिक टेस्टिंग सुरु करण्यात आले. सुमारे 24 तास यावर लक्ष राहणार आहे. रविवारी सायंकाळीही बांधकाम विभागासमोर नळपाणी योजना पुन्हा फुटली. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजना अधिक चांगल्यापध्दतीने होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नवीन नळपाणी योजनेच्या जेलनाका ते गोडीबाव दरम्यान टेस्टिंग सुरु असल्याने, त्यावर 24 तास संबंधितांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे शहरातील जेलनाका, रामआळी, बैलबाग, गवळीवाडा, बाजारपेठ, तेलीआळी, मांडवी व राजिवडा परिसरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे न.प. अधिकार्यांनी सांगितले.