गुहागर मधील बोऱ्या समुद्र किनारी सापडली चरसची 18 पाकिटे

गुहागर:- गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये चरस या अंमली पदार्थाची 18 पाकीटे होती. त्यांचे वजन 20 किलो 700 ग्रॅम इतके होते. सदर पाकीटे कस्टम विभागाने ताब्यात घेतली असून तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर कस्टमचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत.अशी माहिती बोऱ्या कस्टमचे अधीक्षक जय कुमार यांनी दिली आहे.

दापोली तालुक्यातील कद्रे, लाडघर, केळशी, कोळथळे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत चरस या अंमली पदार्थाची पाकीटे सापडल्याने कस्टम, पोलीस सावध झाले होते. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरवात केली. यामध्ये 19 ऑगस्ट रोजी बोऱ्या येथील समुद्रकिनाऱ्यांवर दोन गोणी आढळून आल्या. सदर बेवारस गोणी कस्टम विभागाने ताब्यात घेवून पाहणी केली. त्यावेळी या गोण्यांमध्ये अन्य ठिकाणी सापडलेल्या पाकीटांप्रमाणेच छोटी पाकीटे होती. या पाकिटांमध्ये चरस 20 किलो 700 ग्रॅम हा अंमली पदार्थ होता. त्यामुळे जिल्ह्यात सापडलेल्या एकूण अंमली पदार्थांचे वजन आता 250 किलो इतके झाले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा गस्तीदरम्यान, रत्नागिरीतील दापोली सीमाशुल्क विभागाच्या तटरक्षक दलाला कर्डे समुद्रकिनारी वाहून आलेले 10 संशयास्पद पॅकेट्स (एकूण 12 किलो वजनाची) आढळून आली. तात्काळ ही ड्रग्सची पाकिटं सीमाशुल्क विभागानं ताब्यात घेतली आणि त्यांची तपासणी केली. तपासाअंती चरस (हशीश) असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर केळशी ते बोऱ्या परिसरात सीमाशुल्क विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात आली.