सीमाबकडून दोघा दहशतवाद्यांना दीड वर्ष आर्थिक सहाय्य

रत्नागिरी:- एटीएसने अटक केलेले दहशतवादी तब्बल दिड वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील पणदेरी येथून अटक केलेला सिमाब नसरुद्दीन काझी (२७ ) हा दिड वर्षांपासून त्या दोन दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य करत असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडे ५०० जीबी डाटा सापडला असून यामध्ये मोठ्या शहरातील काही स्थळांचे गुगल इमेज सापडले आहेत.

ड्रोनचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्रलंबित आहे, तर दुसरीकडे आतापर्यंतच्या तपासात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राजकीय नेता किंवा आगामी सण‚उत्सव नसल्याचे पुढे आले आहे. मात्र त्यांचा उद्देश आणि टार्गेट कळण्यासाठी आणखी काही काळ तपास करावा लागणार आहे. या तपासात उघड होणारी माहिती ही नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. कोथरूड पोलिसांनी वाहनचोरी करताना महम्मद इमरान मोहंमद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (२३) आणि मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (२४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्य प्रदेश) या दोघांना पकडले होते. त्यांच्या तपासात दोघेही एनआयने वांटेड जाहीर केलेले दहशतवादी निघाले. दरम्यान, प्रकरणाचा तपास नऊ दिवसांपूर्वी एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसने वेगाने तपास करत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अब्दुल पठाण याला कोंढव्यातून अटक केली. तर त्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कोंढव्यात राहणार्या मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी (२७, रा. कौसर बाग, मुळ पणदेरी,मंडणगड ) याला रत्नागिरी येथून अटक केली होती. तपासादरम्यान त्यांच्याकडे सापडलेले साहित्य आणि केमिकल हे बॉम्ब बनविण्यासाठीच होते आणि त्याची चाचणी कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील जंगलात झाल्याची माहिती बरोबर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे मुंबईतील छाबाडा हाऊसचे छायाचित्र सापडले म्हणून ते टार्गेट होते का याचा तपास सुरु आहे. त्या व्यतिरिक्तही आणखी काही छायाचित्रे त्यांच्याकडे सापडली आहेत. तर सापडलेल्या ५०० जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन वॉश करणारी भाषणे आणि लेखी साहित्य सापडले आहे. खान आणि साकी स्वत:ला ग्राफिक्स डिझायनरचे काम करत असल्याचे सांगत असले, तरी ते प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठीच पुण्यात दाखल झाले होते. तर त्यांना आश्रय देणार्या पठाणचाही ग्राफिक्स डिझायनिंगचा व्यवसाय नसून ते त्याआडून दोघांनाही मदत करत असल्याचे पुढे आले आहे. स्वत:च्या बचावासाठी तिघेही ग्राफिक्स डिझायनिंग व्यवसायाचा आसरा घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांना यासाठी लागणारे पैसे सिमाब काझी पुरवत होता. त्याच्या पैशावरच तिघेही मागील दीड वर्ष पुण्यात राहून ठिकठिकाणी रेकी, बॉम्बस्फोटाचे चाचणी आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती काढत होते, अशी माहिती पुढे येत आहे. खान आणि साकी यांनी राज्यातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत. तेथे ते एकेकदाच गेले आहेत. मात्र, तेथे गेल्यावर त्यांनी राहण्यासाठी कोणते हॉटेल बुक केले नाही. ते जाताना सोबत टेंट घेऊन जात होते. हा टेंट जंगलात किंवा आडबाजूला लावून ते मुक्काम करत होते, अशी माहिती एटीएस तपासात पुढे आली आहे.