विद्यार्थिनींच्या मोफत एसटी प्रवासासाठी एसटी प्रशासनाचे एक पाऊल पुढे

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते 12 वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगार प्रमुखांकडे द्यावी. ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या 50 ते 100 पेक्षा अधिक असेल, त्याठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देणार आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये- जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यावर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो.
पूर्वीसारखे आता प्रत्येक मुलींना पास काढण्यासाठी आगारासमोरील रांगेत उभारण्याची किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पास देतील, अशी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ त्या मुलीचे बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. मुलींना तीन-तीन महिन्यांचे पास दिले जातात. एकदा पास काढला की पुन्हा तीन महिन्यानंतरच पास मिळतो. त्यावेळी देखील मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे. याप्रमाणे आता मुलींना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.