गणपतीपुळेतील लॉजमध्ये जोरदार राडा; दोघांची धुलाई, पाचजणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे किरकोळ कारणातून एका लॉजमध्ये दोघांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठी आणि पाईपने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील एक संशयित फरार आहे. संतोष चंद्रकांत साळवी ऊर्फ दादा साळवी (३८, मूळ रा. मालगुंड, रत्नागिरी), अविनाश अशोक जरग (२८, कऱ्हाड), सागर सुभाष कोळपे (२९, रा. कराड), विनायक शंकर साळुंखे (३६, रा. नांदगाव कराड) आणि मंगेश प्रकाश चव्हाण (२९, रा. कोरेगाव, सातारा) अशी पोलिस कोठडी सुनावलेल्या संशयितांची नावे आहेत. सदर घटना २१ जून २०२३ ला मध्यरात्री बाराच्या सुमारास गणपतीपुळे येथे घडली होती.

फिर्यादी मुक्कदर अक्रम जमादार (३६, रा. कोकणनगर, रत्नागिरी) याने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. जमादार आणि त्याचा मित्र रोहन शिर्के हे दोघे गणपतीपुळे येथील लॉजवर थांबले होते. ते गप्पागोष्टी करत असताना बाहेर दोघे तिघे दारूच्या नशेत मोठमोठ्याने ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकून जमादार आणि रोहन शिर्के रूमबाहेर आले. तेव्हा रोहन शिर्के त्यांच्याकडे बघून हसल्याचा राग आल्याने संशयितांनी दोघांनाही जबर मारहाण केली होती. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली होती. एकजण पसार झाला आहे.