खेड:- दापोली तालुक्यातील वाकवली नावनगर येथील ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेथीलच आरोपी स्वप्नील सुरेश माळी (वय ४२) याला येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालय वर्ग १ चे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी मंगळवारी २० वर्षाची सश्रम कारावासाची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याच्या तापासीक अंमलदार म्हणून दापोली पोलीस स्थानकाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानव्हे यांनी काम पाहिले. तर त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के आर भोये यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून सुदर्शन गायकवाड यांचे सहकार्य लाभले. तर सरकारी वकील म्हणून ॲड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.
सदर घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ०६:३० वाजता आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. आरोपी स्वप्नील माने याच्या राहत्या घरी त्याची भावजय खाजगी शिकवणी घेत असे. या शिकवणीकरिता ही ८ वर्षाची पीडित मुलगी देखील जात होती. दिनांक २८ डिसेंबर २०१७ रोजी नेहमीप्रमाणे ही पीडित मुलगी शिकवणीसाठी गेली होती. संध्याकाळी ०७:३० च्या सुमारास ही मुलगी घरातील बाथरूम मध्ये नैसर्गिक विधीसाठी गेली असल्याचे आरोपीने पाहिले आणि तो तिच्या पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला.
घडलेली ही घटना पीडितेने आपल्या आईला सांगितली. यानंतर आई वडिलांनी या घटनेची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिल्यानंतर भा. द. वी कलम ३७६ / २ ब, आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान २२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील एड मृणाल जाडकर यांनी घेतलेला सारतपास, उलटतपास व सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आरोपी स्वप्नील सुरेश माने याला वीस वर्षाच्या सश्रम कारावास व ५० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावली आहे.