बाळ, माता विभाग एकत्र आणण्यात केली टाळाटाळ
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात बाळ आणि माता यांना एकत्र ठेवण्याच्या सूचना देऊनही गेले दोन महिने टाळाटाळ करणार्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यावर डिपार्टमेंटली कारवाई केली जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. स्त्री रोगतज्ज्ञही कोल्हापूर येथून दोन-चार दिवसात दाखल होतील असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ बाळाला महिला रुग्णालय उद्यमनगर येथे उपचारासाठी ठेवण्यात येते तर मातेला जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवले जाते. याबाबत अनेक तक्रारीही नातेवाईकांकडून करण्यात आल्या. याबाबत बाळ व मातेला एकत्र ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दोन महिन्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. परंतु याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारींचा पाढा वाढत असल्याने, त्यांची डिपार्टमेंटल चौकशी केली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाविषयी वारंवार तक्रारी येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने बुधवारी पालकमंत्र्यांनी कडक भाषेत जिल्हा शल्यचिकित्सकांची कानउघडणी केली. जिल्ह्यातील अन्य विभागातील महिला अधिकार्यांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांचा निर्णय चुकीचा असल्याचे शासकीय अधिकर्यांच्या बैठकीत सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने अनेक प्रसुतीसाठी रुग्णालयात आलेल्या महिलांना कोल्हापूर किंवा डेरवण येथे न्यावे लागते. येत्या दोन-चार दिवसात कोल्हापूर येथून डेप्युटीशनवर स्त्रीरोगतज्ज्ञ रत्नागिरीत दाखल होतील असे ना. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील वैद्यकीय अधिकारी व अन्य प्रश्न सुटावेत यासाठी येत्या महिनाभरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेही रत्नागिरीत येऊन जिल्हा रुग्णालयात भेट देतील असेही ना. सामंत यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासनाने कर्मचारी मंजुरी दिली असून त्यात 63 प्राध्यापकांचा समावेश असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. यावर्षीपासून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.
रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला होता. परंतु एवढ्या पैशात नवे नाट्यगृह उभे राहिल. त्यामुळे दुरुस्तीसाठी योग्य निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. थिबापॅलेस येथील लेझर शोला पुरातत्व विभागाने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मालगुंड येथील प्राणी संग्रालयाला केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिली असून त्यासाठी नियोजनमधून पाच कोटीचा निधी दिला जाणार आहे.