चिपळूण:- शहरातील खाटीक आळी येथे जमिनीच्या वादातून चुलत्यावर, काकीवर दाढीच्या ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून, या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. ४ जून रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबतची फिर्याद ओंकार विश्वनाथ माळी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी मंगेश नारायण माळी, संजय नारायण माळी, ओम सुरेश माळी (सर्व रा. खाटीक आळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
४ जून रोजी रात्री हा वाद झाला. गेले अनेक दिवस या कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. काशिनाथ माळी हे खाटीक आळी येथील एका दुकानाच्या पायरीवर बसले असताना या तीन आरोपींनी या ठिकाणी येऊन चुलते काशिनाथ माळी यांना शिवीगाळ केली. याचा जाब अनिता माळी यांनी विचारला असता याचा राग येऊन तिघांनी त्यांना धक्काबुक्की केली व दाढीच्या ब्लेडने डाव्या खांद्यावर दुखापत केली. यामध्ये अनिता विश्वनाथ माळी व ओंकार विश्वनाथ माळी हे जखमी झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.