रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने पात्र ठरणार्यांना सोडण्याविषयी प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन आले असून, शासनाने त्या शिक्षकांना सोडा असे सांगितले आहे. याला शिक्षण विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रश्न कसा हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हापरिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये सध्या अकराशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती असताना आंतरजिल्हा बदलीने जाणार्या शिक्षकांची त्यात भर पडणार आहे. बदलीसाठी 717 शिक्षकांची यादी तयार आहे. पात्र शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत कार्यमुक्त करा असा शासन निर्णय काढला होता. या शासन निर्णयात विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करा असा उल्लेख होता. रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची रिक्त पदे आणि शिक्षकांना सोडल्यानंतर होणारी रिक्त पदे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम याचा विचार करत जिल्हा परिषद प्रशासनाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडे बदल्यांविषयी मार्गदर्शन मागवले होते. त्यावर उत्तर प्राप्त झाले असून पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे असे नमुद केले आहे. या शिक्षकांना कार्यमुक्त केले तर रिक्त पदांची संख्या सुमारे अठराशेपर्यंत पोचेल. जून अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणारे शिक्षक तिनशेच्यावर आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात रिक्त पदांचा आकडा 2 हजारावर जाईल. नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा कारभार हाकताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मार्गदर्शनावरील उत्तर मिळाल्यामुळे त्यावर कार्यवाही करावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारा यांच्यापर्यंत मार्गदर्शनाची फाईल पोचलेली नव्हती. ती आल्यानंतर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.