चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल वरील पुलावर डंपर आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. यामध्ये डंपर चालकाचा (नाव समजू शकले नाही) जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आयशर टेम्पोच्या चालकाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
उंब्रज येथून निघालेला डंपर खेड मधील लोटे येथे जात होता. मात्र पिंपळी येथील कॅनॉल वरील पुलावर वेगात असलेल्या डंपर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कराड मार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. कामथे उपजिल्हा रुग्णालयात डंपर चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.