रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड व इन्फ्लूएंझाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व स्तरावर सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घ्यावी. सौम्य लक्षणे आढळली तरी कोविड चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे. खबरदारी न घेतल्यास कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 एपिलपर्यंत एकूण 27 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. यातील मंडणगड-1, दापोली-1, खेड-3, चिपळूण-7, संगमेश्वर-8, रत्नागिरी-5, व राजापूर-2 असे असून यापैकी 5 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर 22 रुग्ण गृहविलागीकरणामध्ये आहेत. 2 एप्रिल रोजी नवीन एकही रुग्ण सापडला नाही. जर काळजी घेतली नाही तर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांचेकडून शनिवारी व्ही.सी.द्वारे सर्व आरोग्य संस्थांचा जिल्ह्यातील कोविड रूग्णांबाबत आढावा घेण्यात आला. फेब्रुवारी 2023 पासून राज्यात व देशात कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोवीड रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व स्तरावर सतर्कता बाळगणे आणि पूर्वतयारी करणे यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार रुग्णालयांची तयारी तसेच मॉकड्रील करून घेण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले-गावडे यांचेकडून जनतेला खालीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः सह व्याधी असणार्या व्यक्ती आणि वृध्द यांनी गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थांमध्ये आणि रुग्णालयात मास्कचा वापर करावा. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू वापरणे. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. सर्व व्यक्तिनी कोविड बूस्टर डोस लसीकरण उपलब्ध झाल्यावर करावे. सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी. लक्षणे सौम्य असली तरी कोविड चा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविदयालये, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनीक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी.
इन्फ्लूएंझा (फ्लू) रूग्णांच्या प्रमाणात देखील वाढ
इन्फ्लूएंझा (फ्लू) या हंगामी तापाच्या रुग्णांच्या प्रमाणात देखील वाढ होताना दिसून येत आहे. इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. यामध्ये रुग्णाला ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, अंग दुखी अशी लक्षणे दिसून येतात. इन्फ्लूएंझा ची लागण टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पौष्टिक आहार घ्यावा, धुम्रपान टाळावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. तसेच हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, आपल्याला फ्ल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले आहे.









