तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या पाठी
ईडीनंतर पोलिसांचा ससेमिरा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने देशपांडे यांना तीन एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी ईडी अन् आता पोलिस तपासाचा ससेमीरा पाठी लागल्याने देशपांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नियम धाब्यावर बसून साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी देण्यात आल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशपांडे यांना यापूर्वीच ईडीने ताब्यात घेतले होते, आता दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रायगड जिल्हा रोजगार हमीचे अधिकारी असलेले देशपांडे यांना साई रिसॉर्ट प्रकरणावरून सेवेतून निलंबित करण्यात आले होते. काही दिवसानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. त्यांची सुटका होण्याआधीच आता दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर एम दिघे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंडल अधिकारी सुधीर पारदुले, यांनाही अटक केली होती मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. यातच आता तत्कालीन प्रांत अधिकारी देशपांडे यांना अटक केल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे.

साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनाही ईडीने अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. माजी मंत्री अनिल परब यांचे नाव या प्रकरणाशी वारंवार जोडले जात आहे. परंतू १७ एप्रिल पर्यंत तपास यंत्रणांनी त्यांना अटक करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मात्र या प्रकरणी सदानंद कदम, जयराम देशपांडे, सुधीर पारदुले यांच्या पाठी तपास यंत्रणाचा ससेमीरा कायम आहे.