घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

दापोली:- घरात कोणी नसल्याचा फायदा उठवून कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. दापोली तालुक्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दापोली तालुक्यातील कर्दे येथे २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते १ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ यावेळेत घडली . या चोरीप्रकरणी असलम जैनउद्दीन खतीब ( ६७ , रा . कदें , दापोली ) यांनी फिर्याद दिली आहे . असलम खतीब यांचा वेल्डींगचा व्यवसाय आहे . २२ रोजी ते पत्नीसह मुंबईला गेले होते . त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराची चावी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे दिली होती . खतीब यांच्या घरी काम करणारी महिला ही चावी घेऊन घराची साफसफाई करण्यासाठी जात होती . साफसफाई केल्यानंतर ती महिला चावी पुन्हा शेजारी व्यक्तीकडे देत होती . असलम खतीब हे १ मार्च रोजी पत्नीसह पुन्हा घरी आले असता घरकाम करणारी महिला घरातच होती . असलम खतीब घरात गेले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा त्यांना उघडलेला दिसला . त्यांच्या पत्नीने खात्री केली असता कपाटातील लॉकर उघडे दिसले . त्यांनी लॉकरमध्ये पाहिले असता सोन्याचे दागिने रोख रक्कम अज्ञाताने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्यांनी याबाबत पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून , पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.