बनावट दस्तऐवज, नोटरी तयार करुन वृद्धाची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जमिनीचे बनावट दस्तऐवज आणि नोटरी तयार करुन वृध्दाची फसवणूक करणार्‍या 6 जणांविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश गंगाराम शिवगण (रा.दादर,मुंबई),संतोष पांडूरंग कदम (रा.दादर,मुंबई),अनंत दत्ताराम रहाटे (काळाचौकी,मुंबई),हरेश रामचंद्र मांजरेकर (रा.परेल,मुंबई),तेजस बदियानी (रा.नवी मुंबई) आणि सुनिल राम पाटील (रा.नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात चंद्रकांत शंकर लिंगायत (61,रा.देवरुख पोलिस वसाहत समोर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,त्यांची देवरुख येथे 12 गुंठे जमिन आहे.16 मे 2018 रोजी त्यांनी यश डेव्हलपर्सला डेव्हलप करण्यासाठी दिली होती.परंतू, संशयितांनी विकसन करार करताना लबाडीने व हेतुपूर्वक दाखवलेला ड्राफ्ट व नोंदणी केलेला दस्त यामध्ये तफावत केली तसेच 12 गुंठे क्षेत्राचा नकाशा जोडला नाही. तेव्हा लिंगायत यांनी पुन्हा डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करण्याचा सल्ला विकासकाला देत त्यानंतरच प्रत्यक्ष काम करण्यासाठी मुखत्यारपत्र दिले जाईल असे सांगितले.

  परंतू,मुखत्यारपत्र न घेताच यश डेव्हलपर्सने कामाला सुरुवात केली.याप्रकरणी लिंगायत यांनी तपासणी केली असता 14 जून 2019 रोजी फॉर्म बी अ‍ॅफिडेव्हिट कम डिक्लरेशन अशा मजकुरावर त्यांची खोटी सही केलेला दस्त महाराष्ट्र इस्टेट अ‍ॅथॉरिटीवर (महारेरा) अपलोड केला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.आपली फसवणूक केल्यचे लक्षात येताच त्यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.