चिपळूण येथे विवाहित महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तांबी-रामपूर येथील तरूणाला गुरूवारी अटक करण्यात आली. पीडित विवाहितेला अडचणी सांगून तिच्याकडून त्याने ४० हजार रूपयेही घेतले होते. 

राजेश रवींद्र भोसले (३०, मूळगाव-तांबी- रामपूर, सध्या-खेर्डी) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित ४१ वर्षीय विवाहितेची राजेश याच्याबरोबर फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवर बोलणे, चॅटींग करणे सुरू झाले. यानंतर पती घरात नसताना आरोपी राजेश याने येऊन बळजबरी करून त्याने ११ नोव्हेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या बाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुंखे करीत आहेत.