‘फेसलेस’ प्रणालीमुळे घरबसल्या मिळणार १४ सेवा

प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; हस्तांतर, नोंदणी, शिकाऊ परवान्याचा समावेश

रत्नागिरी:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन आधार क्रमांकाचा वापर करून आता १४ सेवा दिल्या जाणार आहेत. यामध्ये आता घरी बसून वाहन हस्तांतरण (ट्रान्सफर) आणि तात्पुरती नोंदणी करता येणार आहे. केंद्र शासनने आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची वाहनधारकांना ही तरतूद केली आहे. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. आता शिकाऊ वाहन परवाना देखील घरबसल्या मिळणार आहे.

घरातून ऑनलाईन शिकाऊ परवाना परीक्षा देतात, फेस नॉट मॅच, इतर घरातील आवाज घरातील प्रकाश योजना आणि अर्जदाराच्या छोट्या-छोट्या हालचाली यांसारख्या अनेक समस्यांमुळे अर्जदाराची ऑनलाईन परीक्षाच ग्राह्य धरली जात नाही. त्यांना दुरुस्तीसाठी थेट आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाईन शिकाऊ परवान्याची परीक्षा देताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातून शिकाऊ परवाना काढताना आता नव्या नियमावलीनुसार वेबकॅमेरा आवश्यक करण्यात आला आहे. यात अर्जदाराचा आधारकार्डवर दाढी असलेला फोटो आणि शिकाऊ परवाना परीक्षा देताना त्या व्यक्तीला दाढी असेल, तर ती व्यक्ती मैच होत नाही, असे सांगून संगणक प्रणाली ऑनलाईन अर्जच ग्राह्य  धरत नाही. नवीन वेबकॅमेऱ्याची यंत्रणा २० डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३० ते ४० जणांना थेट आरटीओ कार्यालयात येऊन दुरुस्ती करावी लागली आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने यात लक्ष घालून या समस्या तातडीने सोडविल्या.

लर्निंग लायसन्स परीक्षा, डुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, एनओसी आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकॉर्डमध्ये मोबाइलचा नंबर नोंदविणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवेचा समावेश आहे.
फेसलेस सेवेच्या मदतीने तात्पुरती नोंदणी ही सेवा परिवहन संवर्गातील वाहन वैयक्तिक नावावर नोंदणी करावयाची असलेल्या अर्जदारांसाठी सुरू करण्यात आली आहे. वाहन वितरकांनी परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरून वाहनाचे तात्पुरती नोंदणी अर्जाची एन्ट्री व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करता येतील. वाहन वितरकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जामध्ये त्रुटी असल्यास आरटीओ कार्यालय वाहन वितरकास माहिती देईल.