संगमेश्वरात वृध्देच्या गळ्यातील दागिने हिसकावून दुचाकीस्वार फरार

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कळुंबशी ते नायशी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वारांनी लांबवल्याची घटना घडली. याबाबत श्रीमती सुनिता शांताराम चव्हाण (62, कळंबुशी, करंडा, संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता चव्हाण या कळंबुशी मापार्लेवाडी येथील अंगणवाडी शाळेवर अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वा. च्या सुमारास त्या अंगणवाडीतून सुटल्यानंतर कळंबुशी ते नायशी अशा रस्त्याने चालत जात होत्या. यावेळी समोरुन दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने हिसकावली. यामध्ये त्यांच्या मानेला जोरदार हिसका बसला. वयस्कर असल्यामुळे श्रीमती सुनिता चव्हाण यांना धावपळ करता आली नाही ओरडाताही आले नाही. त्यामुळे चोरटे गळ्यातील चेन खेचून फरार झाले.

याबाबतची फिर्याद सुनीता चव्हाण यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. यामध्ये त्यांनी 10 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात दोन चोरटयांवर भादविकलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत