रब्बी हंगामात होणार भाजी लागवड; नऊ हजार हेक्टरचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- महिला बचत गटांचा सहभाग वाढल्यामुळे रब्बी हंगामांतर्गत जिल्ह्यातील क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी ९ हजार ०१० हेक्टरवर भाजीपाला, कडधान्य आणि भाताची लागवड झाली होती. यंदाही तेवढेच उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेतून विविध बियाण्यांचे २ हजार ५८२ रुपयांचे किट वितरीत केले आहे. गेली दोन वर्षे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यंदा आत्मा योजनेसाठी निधी कमी आला तरीही प्रतिसाद लक्षात घेऊन प्राप्त निधीतून ७१३ किटचे जिल्ह्यात वाटप केले गेले.

कोकणात मोठ्याप्रमाणात रब्बी पीके मोठ्याप्रमाणात घेतली जात नाहीत. पावसाळा संपला की भात कापणीला प्रारंभ होतो. नोव्हेंबर महिन्यात पाण्याचा उद्भव असलेल्या ठिकाणी भाजीपाला, कडधान्य यासह भाताची दुबार पिके घेतली जातात. पुर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पध्दतीने वायंगणी शेती केली जात होती. उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग करणारी कुटूंबे अत्यंत कमी होती; मात्र महिला बचत गट स्थापनेची मोहिम वेगाने राबविल्यानंतर रब्बी हंगामातील लागवडीचा उपयोग उत्पन्नाचे साधन म्हणून होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील क्षेत्र वाढीसाठी जिल्हा नियोजनकडून कृषी विभागाला अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयोग दरवर्षी राबवला तर त्याचा फायदा रब्बीतील क्षेत्र वाढीला होणार आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे ७ हजार हेक्टरवर रब्बीअंतर्गत लागवड होते; परंतु आत्मा योजनेतून गेली दोन वर्षे बियाण्यांचे किट वितरीत करण्यास आरंभ केल्यामुळे लागवडीकडील कल वाढू लागला आहे. गतवर्षी ३ हजार ९०० रुपयांची सुमारे आठशेहून अधिक किट शेतकरी, बचत गटांना देण्यात आली होती. त्यात चवळी, भेंडी, घेवडा, माठ, वाल, कुळीथ, मोहरी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, दुधी भोपळा, घोसाळी, मिरची, मुळा, वाली यांचा समावेश आहे. आत्मा योजनेतून तरतुद असल्यामुळे रब्बीसाठी यंदाही ७१३ किट उपलब्ध करुन दिली गेली आहेत. २ हजार ५८२ रुपयांचे एक किट आहे.