एटीएम मध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार; दोघांवर गुन्हा दाखल

खेड:- बँकेच्या ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी दिलेल्या ५५ लाख ५० हजार रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोन संशयितांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करीत असलेल्या कंपनीचे हे दोघे कर्मचारी आहेत.

अॅक्सिस बँकेच्या तीन व स्टेट बँकेच्या दोन अशा पाच एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनीने दोघांकडे वरील रक्कम दिली होती. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रायटर बिझनेस सर्व्हिसेस डोंबिवली या कंपनीकडे खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम आहे. या कंपनीचे अमोल अशोक नाचरे (रा. उंबर्ले, ता. दापोली) व प्रथमेश विश्वनाथ शिर्के (रा. तळे, ता. खेड) कर्मचारी आहेत. कंपनीतून पैसे घेऊन ते एटीएममध्ये भरण्याचे काम करीत होते. ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अॅक्सिस बँकेच्या तीन व स्टेट बँकेच्या दोन एटीएममध्ये भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले ५५ लाख ५० हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये भरलेच नाहीत. त्यांनी या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली असून, या दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.