रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या डॉक्टरचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर मिलींद कुळकर्णी हे मारुती मंदिर परिसरातील आनंद नगर येथे राहतात. शनिवारी सायंकाळी गणेशोत्सवासाठी ते धामणसे येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. सोमवारी सकाळी ते रत्नागिरीत दाखल झाले. घरी आल्यानंतर त्यांना सारा प्रकार दिसून आला.
गणेशोत्सवासाठी गावी जाताना डॉ. कुळकर्णी यांनी आपला बंगला व्यवस्थित बंद केला होता. तशी खात्री करून ते धामणसे येथे गेले होते. सोमवारी सकाळी घरात प्रवेश केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारानजीक असलेली स्लायडिंगची खिडकी उचकटलेली त्यांना दिसून आली आणि त्यातूनच चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
या ठिकाणी चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर जाऊन त्या ठिकाणी असलेली दोन कपाटे फोडली. एका कपाटात त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, दुसर्या कपाटात रोख रकमेसह दागिने त्यांच्या हाती लागले. संपूर्ण कपाट अस्ताव्यस्त केले होते.
डॉ. कुळकर्णी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यामध्ये २७ हजार रुपयांची रोकड, पाव किलो वजनाचा चांदीचा तांब्या, सोन्याची अंगठी, कानातला जोड असा मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी संपूर्ण बंगला पिंजून काढला. त्यातून देव्हारासुद्धा सुटला नाही. देव्हार्यात सोन्यासह चांदीच्या मूर्ती होत्या. मात्र, त्या मूर्तींना त्यांनी हात लावला नाही. देव्हार्यातील काही वस्तू अस्ताव्यस्त केल्या व तेथून ते मागच्या दरवाजाकडे वळले होते.
बंगल्याच्या मागील भागाला लोखंडी दरवाजा होता. त्या दरवाजाला देखील कुलूप लावलेले होते. या बंगल्यातून पळ काढताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप फोडले आणि मागच्या दरवाजाने ते पसार झाले. कुलूप फोडण्यासाठी त्यांनी कटावणीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सकाळी ७ वा.च्या सुमारास डॉ. मिलींद कुळकर्णी आपल्या कुटुंबियांसमवेत रत्नागिरीत दाखल झाले. घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला त्यावेळी किचनजवळचा लोखंडी दरवाजा त्यांना उघडा दिसला. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या पत्नीने वरच्या मजल्यावर धाव घेतली आणि सारा प्रकार उघडकीस आला.
या प्रकारानंतर तात्काळ पो. नि. विनीत चौधरी यांनी आनंद नगर येथे धाव घेतली. चौधरी हे नियोजित बंदोबस्ताच्या कार्यक्रमाकरिता बाहेर पडले होते. मात्र, घरफोडी झाल्याचा फोन आल्यानंतर ते स्वत: घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर आपल्या टीमला त्यांनी घटनास्थळी पाचारण केले.
घरफोडी झाल्यानंतर काही पुरावे चोरट्यांनी त्या ठिकाणी ठेवले. याची मदत घेत तात्काळ डॉगस्कॉडला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. त्यातील श्वानाला संशयित वस्तूंचा वास देऊन श्वान चोरट्यांचा माग काढत विश्वनगरपर्यंत धावत गेले व त्याच ठिकाणी घुटमळले.
घरफोडी झाल्यानंतर ठसे मिळविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक लॅबचे एक पथक डॉ. मिलींद कुळकर्णी यांच्या घरी दाखल झाले. संपूर्ण बंगल्याची पाहणी करून या पथकाला चोरट्यांचे ठसे मिळविण्यात यश आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी डॉ. मिलींद कुळकर्णी यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
पूर्णगडमध्ये बंगला फोडला
पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीत देखील घरफोडीचा प्रकार घडला आहे. एक बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातून रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. एकाचवेळी रत्नागिरीत तालुक्यात दोन बंगले फुटल्याने पोलिसांनी देखील चोरट्यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे.