आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर दुमदुमले

रत्नागिरी:- प्रति पंढरपूर समजल्या जाणार्‍या रत्नागिरीत आषाढीएकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या आषाढी एकादशीला भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रिघ लावली होती. विठ्ठलाचा नामघोष करीत येणार्‍या दिंड्या आणि मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम यांनी भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून येत होते. विठ्ठलाच्या दर्शनाकरीता पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती. 

आषाढीएकादशी दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विठ्ठल दर्शनाकरीता पहाटे चार वाजल्यापासून भाविकांचा मार्ग मोकळा केला होता. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनाकरीता हजेरी लावली होती. शहराच्या विविध भागातून वारकर्‍यांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरात येत होत्या. रविवारी पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली असली तरी आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती. जुनमध्ये गायब झालेला पाऊस आणि जुलैमध्ये सक्रिय झालेला पाऊस पुन्हा आषाढीएकादशीच्या मुहूर्तावर जोरदार बरसू दे अशी विनवणी भाविकांनी विठ्ठल चरणी केली.

आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे चार वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांचा प्रारंभ झाला. मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे ४ ते ५ या कालावधीत विठुरायाचा पुरोहीतांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ५ ते ६ या वेळेत काकड आरती आणि सकाळी ८ वाजल्यापासून रात्रौ ११ पर्यंत विविध भजन मंडळाची भजने पार पडली. आषाढीएकादशीनिमित्त येथील परटवणे भार्गव मंदिर ते विठ्ठल मंदिरपर्यंत दिंडी काढण्यात आली. विठ्ठल दर्शनाकरीता भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पूजेचे साहित्य आणि तुलशीमाळा मंदिराबाहेर उपलब्ध होत्या. विठ्ठल रखूमाई मंदिरात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

प्रथमच मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर दिंडी

यावर्षी प्रथमच मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास तीन हजार जणांची दिंडी रविवारी सकाळी निघाली. पायी मार्गक्रमण करत ही दिंडी विठ्ठल मंदिरात पोहचली.