साखरपा- ठाणे बस संगमेश्वर नजीकच्या लोवले येथे कलंडली

साखरपा:- रविवारी सकाळी ८.१५ वा. सुटलेली साखरपा-ठाणे बस संगमेश्वर नजीकच्या लोवले येथे आली असता ती रस्त्याच्या बाजूला जावून कलंडली. हा अपघात सकाळी ८.४५ वा. च्या सुमारास घडला.  या अपघातात दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

लोवले बस थांब्याच्या पुढील ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा मार्ग हा अरुंद आहे . रुंदीकरणा दरम्यान येथील रस्ता रुंद करण्यात आलेला नाही . उजवीकडे असलेल्या नाल्याला चिऱ्याची असणारी संरक्षक भिंत जीर्ण झाली आहे. या भिंतीचे चिरे दरवर्षी ढासळत आहेत. तर डाव्या बाजूला लागूनच खोल खड्डा असल्याने रस्त्याची बाजू ढासळत आहे. अशा स्थितीत दोन मोठी वाहने येथून एकाचवेळी जाणे अशक्य होते. मोठ्या वाहनाचे चाक रस्त्याच्या साईड पट्टी जवळ गेल्यास रस्ता आपोआप खचतो आणि वाहन अपघातग्रस्त होते. यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडून अपघात घडले आहेत. 

गेली तीन चार वर्षे संगमेश्वर साखरपा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु होते. मात्र लोवले येथील रस्त्याच्या दुतर्फा असणारी समस्या कायम असून येथे रस्ता रुंद केला गेला नाही. याचा परिणाम म्हणून येथे वाहने अपघातग्रस्त होत आहेत.