7 वर्षीय आर्याची आत्महत्या नसून खून; आईच्या फिर्यादीनंतर वडिल, आजी-आजोबांसह आठ जणांवर गुन्हा

लांजा:-तालुक्यातील कोर्ले येथील आर्या राजेश चव्हाण या सात वर्षीय बालिकेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून आर्या हीची आई माया राजेश चव्हाण हिने शनिवारी १८ जुन रोजी लांजा पोलिस ठाण्यात केलेल्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आर्याचे वडील तसेच आजी-आजोबा आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध भादवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या सात वर्षीय बालिकेने आत्महत्या केल्याची घटना ११ जून रोजी घडली होती. सुरुवातीला आर्या हिचे वडील राजेश चव्हाण यांनी  दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आर्याने आत्महत्या केल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती .मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याची फिर्याद आर्या हिची आई माया राजेश चव्हाण (वय ३४ राहणार वडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा) हिने लांजा पोलिस ठाण्यात केली आहे.  यानुसार लांजा पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांवर भादवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माया राजेश चव्हाण  हिचे २००५ मध्ये राजेश सुभाष चव्हाण (राहणार कोर्ले लांजा) याच्याबरोबर लग्न झाले होते. राजेश चव्हाण याला दारूचे व्यसन होते.तो दररोज दारू पिऊन माया हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत असे. यादरम्यान या दोघांनाही तीन मुली झाल्या होत्या.या तीन मुलींमध्ये प्रिया (वय १८ वर्षे ) अनुजा (बारा वर्षे) आणि आर्या सात वर्षे . राजेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माया ही आपल्या तीनही मुलींना घेऊन ती आपल्या माहेरी फलटण येथे राहायला गेली होतीी. याच दरम्यान राजेश याने काजल हिच्याशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान आपण दुसरे लग्न केले याची माहिती पहिल्या पत्नी म्हणजे मायाला मिळाली होती. पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी राजेश याने माया हीच्याशी चांगले वागण्याचे नाटक करून आपल्या दोन्ही मुली आर्या आणि अनुजा यांना घेऊन तो कोर्लेे येथे रहायला आला होता.

  मात्र कोर्ले येथे आल्यानंतर या दोन्ही मुलींना आजी सुनंदा व सावत्र आई काजल हिने त्रास देण्यास सुरुवात केली होती. दिनांक ११ जून रोजी  रात्र नऊ वाजण्याच्या दरम्याने माया हीची सासु सुनंदा सुभाष चव्हाण आणि चुलत नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी आर्या हिचा घरात गळा आवळून खून केला. यासाठी या दोघींना इतर सहा जणांनी सहकार्य केले. या प्रकरणी  लांजा पोलिसांनी माया राजेश चव्हाण हिची  सवत सासू सुनंदा सुभाष चव्हाण, नणंद अनिता नागेश चांदेकर, सासरा सुभाष नारायण चव्हाण, दीर  दीपक सुभाष चव्हाण, सावत्र दीर सुरज सुभाष चव्हाण, सवत काजल राजेश चव्हाण, तिचे वडील सर्जेराव नारायण मोहिते ( राजापूर )आणि पती राजेश सुभाष चव्हाण अशा एकूण आठ जणांवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहे