मच्छी मार्केट येथे ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्याला सापळा रचत पकडले

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पुन्हा एकदा अंमली पदार्थाचा विळख्यात अडकत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी रात्री ८.४५ वाजण्याचा सुमारास शहरातील मच्छिमार्केट कडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर ब्राऊन शूगर हा अंमली पदार्थ सोबत असलेल्या सलमान मोहम्मद अली खान (३०, रा. कोकणनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना त्यांच्या खास खबर्‍याने दिलेल्या माहितीवरुन त्यांनी पथक तयार करुन चर्च रोड मार्गावर तपासणी साठी पाठवले होते यावेळी सलमान खान हा सुमारे १.१७ वजनाचा ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ विक्रीचा उद्देशाने उभा असताना पोलिसांना आढळला त्याची झडती घेतली असता ब्राऊन शुगर, प्लॅस्टीकचा पाकीटमध्ये बंद केलेल्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. सलमान खान याला मुद्देमालासह शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.