खेड:- दिवा पॅसेंजर मधून पडल्याने मुंबई पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे, हा अपघात रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर खेड तालुक्यातील सुकिवली बौद्धवाडी नजीक झाला. उमेश पांडुरंग भोसले (४५) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते दापोली तालुक्यातील टेटवली या त्यांच्या मूळगावी उन्हाळी सुट्टीसाठी आले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार उन्हाळी सुटटीत आपल्या मूळगावी आलेले उमेश पांडुरंग भोसले हे काल परतीच्या प्रवासाला निघाले होते. खेड स्थानकावर त्यांनी रत्नागिरी- दिवा पॅसेंजर पकडली. या ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ते दरवाज्यातच उभे होते. खेड स्थानकातून ट्रेन सुटल्यानंतर ती काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुकीवाली बौद्धवाडी नजीक पोहचली. यावेळी दरवाज्यात उभे असलेल्या भोसले यांचा अचानक तोल गेला आणि ते ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
सुकीवली येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती मदतगृपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांना देताच गांधी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी भोसले यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रार्थमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील नायर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.