दापोली:-दापोली तालुक्यातील पांगारी खाडी किनारी महसूल विभागाने सील करून क्रेन चोरीस गेली आहे. या क्रेनच्या चोरीची तक्रार दापोली महसूल विभागाने दापोली पोलीस स्थानकात करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
दापोली पांगारी खाडी किनारी महसूल विभाग पथकाने २०२० साली वाळू चोरीच्या अनुषंगाने खाडी किनारी उभी असलेली क्रेन मशनरी सील केली होती. तर २०२० साली जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी देखील याच खाडीतून होणाऱ्या वाळू उपशावर कारवाई करून ही क्रेन देखील सील केली होती. तशी नोंद देखील महसूल विभागाने पंचनाम्यात घातली आहे. त्या नंतर २०२१ साली मंडळ अधिकारी सुधीर पार्दूले यांनी देखील याच खाडीतून होणाऱ्या वाळू उपशाबाबत पंचनामा करून ही क्रेन मशनरी सील तोडलेल्या अवस्थेत आहे, असे पंचनाम्यात म्हटले आहे. त्या नंतर दापोली महसूल विभाग ही क्रेन ताब्यात घेईल, असे दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी पत्रकाराना माहिती देताना सांगितले.
मात्र महसूल विभागाच्या दिरंगाईचा फायदा क्रेन चोरांनी घेतला असून ही क्रेन चोरीस गेली आहे. या क्रेन चोरी प्रकरणात काही राजकीय धागेदोरे असण्याची शक्यता स्थानिकांमधून वर्तवली जात आहे. त्यामुळे दापोली महसूल विभाग ही कारवाई करण्यास चालढकल करत आहे का? अशी चर्चा देखील दापोली तालुक्यात रंगली आहे.
ही क्रेन मशनरी जवळपास 15 ते 20 लाख इतक्या किंमतीची असून या बाबत पोलीस स्थानकात तक्रार होणे अपेक्षित आहे असे दापोलीतील नागरिक बोलताना दिसत आहेत. या पूर्वी दापोली महसूल विभागाने नदी किनारी पडलेल्या खडशाचे अंदाजावरून तडीपारीचे गुन्हे दाखल केले. मात्र या क्रेन प्रकरणात दापोली महसूल विभाग नेमकं धाडस का दाखवत नाही असा सवाल देखील दापोलीतील नागरिक उपस्थित करत आहेत.या बाबत रत्नागिरी मा.जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या क्रेन चोरी बाबत तपास लावण्यासाठी आदेश द्यावे अशी मागणी होत आहे.









