चेक बाऊन्स प्रकरणी 3 महिने कारावासाची शिक्षा

 रत्नागिरी:-चेक बाऊन्स प्रकरणी एका आरोपीला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तक्रारदाराला ७४ हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देण्यात आला आहे. भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीला आणखी एक महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. अमोल अनंत भोसले असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

 आरोपी अमोल भोसले याने फरसाण व्यवसायासाठी फिर्यादी सुफियान ट्रेडर्स, शरीफ युसूफ मेमन, यांच्याकडून किराणा माल घेतला होता. त्यापोटी त्याने धनादेश (चेक) दिला होता. हा धनादेश वटला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला नोटीस दिली. तरीही आरोपीकडून रक्कमेची परतफेड करण्यात आलेली नाही. यानंतर फिर्यादीने आरोपीविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट कलम १३८ नुसार न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार चेक बाऊन्स प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मतकर यांनी भोसले याला तीन महिने शिक्षा ठोठावली. तसेच तक्रारदाराला ७४ हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे ऍड.मनिष चंद्रकांत नलावडे, ऍड तनया तुषार सावंत यांनी बाजू मांडली.