रविवारी कोसळलेल्या अवकाळी पावसाने तीन तालुक्यात लाखोंचे नुकसान

रत्नागिरी:- वेगवान वार्‍यासह पडलेल्या गारांच्या अवकाळी पावसाने दापोली, चिपळूण, संगमेश्‍वर या तिन तालुक्याना तडाखा बसला. यामध्ये घरा, गोठ्यांचे २३ लाखाचे नुकसान नोंदले गेले असून एकट्या संगमेश्‍वर तालुक्यातील आठ गावातील १२० मालमत्तांचा समावेश आहे. या तालुक्यातील नुकसानीचा आकडा बावीस लाखापर्यंत गेला आहे. यामध्ये वाडाविसराड गावातील एका घरावर विज पडून नुकसान झाले. सुदैवाने ग्रामस्थांना दुखापत झाली नाही.

जिल्ह्यात रविवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी २.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात संगमेश्‍वर २० मिमी, रत्नागिरी ४, लांजा २ मिमी पावसाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरवात झाली. हवामान विभागाकडून पावसासंदर्भात सतर्कतेचा इशारा पुर्वीच दिला होता. विजांच्या कडकडाटासह वादळसदृश्य स्थिती संगमेश्‍वर, खेड, दापोली तालुक्यात होती. संगमेश्‍वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. वेगवान वार्‍यामुळे झाडे उन्मळून घरा, गोठ्यावर पडून नुकसान झाले. काहीच्या छताचे कौले, पत्रे उडून गेले. संगमेश्‍वर तालुक्यात सुमारे दोन तास वार्‍याचे तांडव सुरु होते. संगमेश्‍वर तालुक्यातील १२० घरे, गोठे आणि मंदिराचे नुकसान झाले आहे. त्यात धामापुर तर्फे संगमेश्‍वरमधील २० मालमत्तांचे पावणेदोन लाखाचे, डींगणी कुरण येथील १४ घरांचे चार लाखाचे,
फुणगुसमधील एका घराचे ४७ हजार रुपये, नारडुवेमधील ६७ मालमत्तांचे १५ लाख रुपये, असावेतील चार घरांचे ४० हजार रुपये तर वाडाविसराड येथील एका घरावर विज कोसळून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. यातील काही घरांचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच पाऊस आणि वादळामुळे दापोलीत पिसईतील तिन घरांचे व पालघरमधील एका घराचे १३ हजार रुपये, चिपळूण तालुक्यातील तिवरे, धेंदवाडी, धनगरवाडीतील तिन घरांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.