रत्नागिरी:-कुवारबाव येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला शहर पोलीसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोराला रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आसिफ उस्मान डांगे (१९, रा. बत्तीस शिराळा, सांगली ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत मंगेश मोहन चाळके ( ३७, रा.खेडशी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार,कुवारबाव येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएम कॅश बॉक्सचा पुढील लोखंडी दरवाजा अर्धवट उघडून कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित डांगेला अटक केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.