डॉक्टरला साडेचार लाखाचा चूना लावणाऱ्या दोघा महिलांच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी:- प्राण्यांच्या दवाखान्यात आपल्या गुगल पे अकाउंटवर सुमारे ४ लाख १२ हजार १७२ रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने  ३ दिवसांची वाढ केली. यापूर्वी त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

रेणुका बबन गिजे (२६, रा . के . सी . जैननगर , रत्नागिरी) आणि दिशा दिनेश सुर्वे (२८, रा. शांतीनगर, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. अविनाश भागवत (४८, रा. टिळक आळी रत्नागिरी) यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

 डॉ. भागवत यांचे साळवी स्टॉप येथे पेट्स गॅलरी नावाचे दुकान आहे. त्यात या दोन संशयित महिला कामाला होत्या. त्यांनी डॉक्टर भागवत यांची परवानगी न घेताच गुगल पे अकाउंटवर शॉपच्या व्यवहाराची रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक केली होती.