महिला कृषी सहाय्यकाची गळफास घेत आत्महत्या

देवरुख:-देवरुख येथील तीस वर्षीय महिला कृषी सहाय्यकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी देवरुख येथे उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

देवरुख पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार पूजा शिवकुमार राजपूत असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राजपूत यांनी का आत्महत्या केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याबाबतची फिर्याद कृषी सेवक सुरेश विठ्ठल बोडके यांनी दिली आहे.  पूजा राजपूत या देवरुख तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक या पदावर गेली चार वर्षे कार्यरत होत्या.  तालुक्यातील तुरळ बिट त्या सांभाळत होत्या. 

 पूजा राजपूत यांचा २७ नोव्हेंबर २०१५  रोजी विवाह झाला होता. दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नोकरी निमित्ताने पूजा राजपूत या  देवरूखातील मातोश्री बिल्डींग मध्ये वास्तव्याला होत्या.  पूजा राजपूत यांचा भाऊ गेली दोन दिवस दूरध्वनीवरून संपर्क साधन्याचा प्रयत्न करत होता.  मात्र संपर्क झालेला नाही. त्यामुळे तळमजल्यावर राहणाऱ्या सुरेश बोडके यांच्याशी संपर्क साधून पूजा राजपूत यांची चौकशी करण्यास सांगितले.  

  यानुसार सुरेश बोडके शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पूजा राजपूत यांच्या खोलीकडे गेले असता त्या दिसून आल्या नाहीत. आजूबाजूला पाहणी केली असता बिल्डिंगच्या टेरेसवर असलेल्या शौचालयांमध्ये पूजा हि गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आली. 

       याबाबतची खबर देवरुख पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी व पंचनामा केला.  राजपूत यांनी का  आत्महत्या केली त्याचे कारण मात्र समजू शकले नाही.  राजपूत यांनी दोन दिवसापूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पूजा राजपूत यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहे.